वर्धा, पुढारी वृत्तसेवा : बसमध्ये प्रवाशातील वादात मध्यस्थी केली असता हिंगणघाट येथे ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.२५) रात्रीच्या सुमारास घडली. जेठानंद राजपूत असे जेष्ठ नागरिकांचे नाव असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा जिल्हा संघचालक आहे. या घटनेनंतर हिंगणघाट शहरात रात्रीच्या वेळी काहीसे तणावाचे वातावरण होते. नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमन्वये गुन्हा दाखल करत एका जणाला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटकडे प्रवास करत होते. बसमध्ये दोन जणांचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत मध्यस्थी करण्यास गेले. त्यावेळी संबंधित युवकाने त्यांना शिवीगाळ केली. सोबतच त्याने सहकाऱ्यांना हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्ता येथे बोलावत जेठानंद राजपूत यांना बसखाली उतरवून ८ ते १० जणांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते. इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांची टीम रात्रीपासून हिंगणघाट शहरात सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी परिस्थिती हाताळली. संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.