

Young Woman Dies Katol
अमरावती: आई-वडिलांसह मामाच्या गावी दुचाकीने निघालेल्या जिल्ह्यातील राजुराबाजार येथील पंचवीस वर्षीय तरूणीचा मालवाहू वाहन व दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. तर आईवडील गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास काटोल (जि. नागपूर) येथे घडली.
राजुरा बाजार येथील रहिवासी असलेले जगदीश नथीले हे पत्नी संगीता, मुलगी कर्तव्या सोबत (एम एच २७ सी ई ०३६४) या क्रमांकाच्या दुचाकीने धापेवाडा (जि. नागपूर) येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान गळपुरा काटोल येथे मागून येणाऱ्या (एम एच ४० सीटी ६०२६) या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगी कर्तव्या नथीले (वय २५), जगदीश नथीले, संगीता नथीले हे तिघेही गंभीर जखमी झाले.
अपघात होताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना नागपूर येथील दवाखान्यात रवाना केले. मात्र, कर्तव्या हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा वाटेतच मृत्यू झाला. जखमी जगदीश नथीले, संगीता नथीले या दोघांवर उपचार सुरु आहेत. कर्तव्या ही पुण्यातील एका कंपनीमध्ये नोकरीला होती. तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. त्यामुळे ती गावी राजुरा बाजार येथे आली होती. दरम्यान सोमवारी (दि. ५) कर्तव्याच्या मृतदेहावर राजुरा बाजार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावात शोककळा पसरली होती.
कर्तव्या हिच्या लग्नाची तयारी सुरु होती. दरम्यान, तिला नागपूर येथील मुलाचे स्थळ सांगून आले होते. सोमवारी नागपूर येथील मुलाच्या घरी जायचे असल्याने तिचे आई वडील कर्तव्याला घेऊन दुचाकीने धापेवाडा (जि. नागपूर) येथे जात होते. रात्री धापेवाडा येथे मामाच्या घरी मुक्काम करून सकाळी ते नागपूर येथील मुलाच्या घरी जाणार होते. मात्र, धापेवाडा येथे जात असताना हा अपघात होऊन कर्तव्याचा त्यात दुदैवी मृत्यू झाला.