Amravati Teachers Constituency Election : अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी वाशिम जिल्ह्यात ९५.१३ टक्के मतदान

जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर प्रक्रिया शांततेत; रिसोडमध्ये सर्वाधिक ९६.६२ टक्के मतदान
Amravati Teachers Constituency Election : अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी वाशिम जिल्ह्यात ९५.१३ टक्के मतदान
pudhari photo
Published on: 
Updated on: 
अजय ढवळे

वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) वाशिम जिल्ह्यात शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात मतदान पार पडले. जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली. जिल्ह्यात एकूण ९५.१३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, रिसोड येथे सर्वाधिक ९६.६२ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७१५ नोंदणीकृत मतदारांपैकी ३ हजार ५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २ हजार ७५९ पुरुष आणि ७७५ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ९५.३४, तर महिला मतदारांची टक्केवारी ९४.४० इतकी नोंदविण्यात आली.

टप्प्याटप्प्याने वाढला मतदानाचा टक्का

सकाळी १० वाजेपर्यंत १६.८२ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ वाजेपर्यंत ही टक्केवारी ३६.०२ वर पोहोचली. दुपारी २ वाजेपर्यंत ६४.०२ टक्के मतदान झाले, तर मतदानाची वेळ संपेपर्यंत अंतिम टक्केवारी ९५.१३ इतकी झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला.

रिसोडमध्ये सर्वाधिक मतदान

जिल्ह्यातील मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार, वाशिम येथील मतदान केंद्र क्रमांक ५७ वर ९५.६६ टक्के, तर केंद्र क्रमांक ५८ वर ९६.४१ टक्के मतदान झाले. मंगरूळपीर येथे ९५.१३ टक्के, रिसोड येथे ९६.६२ टक्के, मालेगाव येथे ९४.७० टक्के, कारंजा येथे ९३.९५ टक्के आणि मानोरा येथे ९१.४८ टक्के मतदानाची नोंद झाली. रिसोडने जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी

मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील व्यवस्था, सुरक्षा आणि मतदारांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

चोख पोलीस बंदोबस्त

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ पोलीस अधिकारी, २२८ पोलीस अंमलदार आणि १४ होमगार्ड तैनात करण्यात आले होते. मतदान प्रक्रियेसाठी सात मतदान केंद्राध्यक्ष, प्रत्येकी सात प्रथम, द्वितीय आणि तृतीय मतदान अधिकारी तसेच राखीव कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वय आणि नियोजनामुळे जिल्ह्यातील सर्व सात मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया कोणत्याही मोठ्या अडथळ्याविना पूर्ण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news