Amravati Crime : वैशाली हत्याकांडातील आरोपी अद्यापही फरार, अमरावती पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना

आईने बडनेरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

अमरावती : अमरावतीतील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या दाभा गावातील वैशाली मेहरे हत्याकांडातील आरोपी पती ललित मेहरे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपीच्या शोधासाठी बडनेरा पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके सातत्याने छापे टाकत आहेत. त्याच्या संभाव्य जुन्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित मेहरे दाभा गावात मामाच्या घरी पत्नी वैशाली आणि आईसोबत राहत होता. १६ सप्टेंबरच्या रात्री त्याने नशेत पत्नी वैशालीसोबत वाद घालून तिला बेदम मारहाण केली. आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिलाही मारहाण केली. मुलाच्या रोजच्या भांडणाला आणि आक्रमक वागणुकीला कंटाळून आई त्या रात्री गावातीलच एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी निघून गेली. याच दरम्यान ललितने वैशालीला बेदम मारहाण केली, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे, घरात वैशालीचा मृत्यू झाल्याची आईला त्यावेळी कोणतीही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी ललित पुन्हा आईकडे आला आणि दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. आईने नकार दिल्यावर त्याने तिला पुन्हा मारहाण केली.

अखेर मुलाच्या या त्रासाला कंटाळून आईने बडनेरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तोपर्यंत पोलिसांना किंवा कुटुंबीयांना घरात वैशालीची हत्या झाल्याची माहिती नव्हती. आईच्या तक्रारीनंतर पोलीस जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा या हत्याकांडाचा उलगडा झाला. आता या फरार आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news