

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: दीक्षा घेण्यासाठी आलेल्या सेवाधारी अल्पवयीन मुलीवर मठ प्रमुखासह एका मुनीने अनेकवेळा सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रिध्दपूर येथील मठात बुधवारी (दि.19) उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून अल्पवयीन मुलीच्या मावशीसह मठातील दोन्ही मुनींना अटक केली आहे. सुरेंद्रमुनी तळेगावकर (वय 75 रा. रिध्दपूर) आणि बाळासाहेब देसाई (वय 40 रा.रिध्दपूर) व एक महिला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. (Amravati Crime News)
17 वर्षीय मुलीच्या कुटुंबातील सर्वच सदस्य एका पंथाचे आहेत आणि ते वेगवेगळ्या मठात राहतात. संबंधित मुलगी वर्षभरापासून रिध्दपूर येथील सुरेंद्रमुनी तळेगावकर याच्या मठात मावशीसोबत राहत होती. ती सेवक म्हणून गत एक वर्षापासून मठातच मुनींची सेवा करीत होती. कधी कधी आई-वडील तिला भेटायला येत होते. तर कधी ती मावशीसोबत त्यांना भेटायला त्यांच्या मठात जात होती. कुटुंबातील सर्वच मठात राहत असल्यामुळे तिला सुध्दा मठातच रहावे लागत होते. मठप्रमुख सुरेंद्र तळेगावकर याने 2 एप्रिल 2024 ला तिच्या मावशीच्या मार्फत मुलीला त्याच्या तळघरातील खोलीत बोलाविले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मठातच राहणाऱ्या बाळासाहेब देसाई यानेसुध्दा तिच्यावर अत्याचार केला.
मुलीने विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली. गळ्यावर पाय ठेवून कुणाला काहीही सांगितले, तर जिवाने मारून टाकेन, अशी धमकी त्याने तिला दिली. दरम्यान, सुरेंद्रमुनीच्या तावडीतून सुटल्यावर पीडित मुलीने आपबिती मावशीकडे कथन केली. मात्र, मावशीने या कृत्याचे समर्थन करीत याबाबत कुणाला काहीही सांगू नको, असे तिला बजावले. त्या दिवसांपासून पीडित मुलीला मठाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर मावशी बळजबरीने तिला सुरेंद्र मुनीकडे तळघरात पाठवायची आणि दोन्ही मुनी तिच्यावर बलात्कार करीत होते. तर तिची मावशी त्यांना सहकार्य करीत होती.
दरम्यान, मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. मात्र, मावशी व मठात राहणाऱ्या सर्व मुनी व दीक्षा घेतलेल्या महिलांनी हा गंभीर प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मुलीचे वडील तिला भेटायला मठात आले, तेव्हा मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाण्यात धाव घेतली. शिरखेड पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर मुलीची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुलीच्या तक्रारीवरून बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून सुरेंद्र तळेगावकर, बाळासाहेब देसाई आणि पीडितेची मावशी यांना अटक केली आहे. पुढील तपास शिरखेड पोलिस करीत आहे.