

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: मेळघाटमध्ये धारणी तालुक्यात यात्रा सुरु असल्याने मोठ्याप्रमाणावर वाहनांची वर्दळ आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. बुधवारी (दि.15) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत.
मोतीमाता- राजपूरया यात्रेतून परत गावाकडे जात असताना राजपूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने संतोष चिलात्रे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अमरावतीत रेफर करण्यात आले. यासह दुसऱ्या घटनेत राणामालूर येथील संतुलाल झनकलाल सावलकर (25) हे टिटम्बा यात्रेतून परत आपल्या गावी राणामालूर येथे जात होते. दरम्यान त्यांना धारणी- परतवाडा मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात संतुलाल झनकलाल सावलकर (25) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजकुमार भिलावेकर (24) हे गंभीर जखमी असून त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.