प्रेम प्रकरणातून युवकाने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना अमरावतीमधील सिव्हिल लाईन परिसरात घडली. निलेश प्रकाशराव गुजर (वय २७, रा. मोर्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्या तरुणाने पोलीस भरतीची परीक्षाही दिली होती. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळूनच त्याने जीवन संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
निलेश आपल्या मावशीच्या घरी दर्यापूरात मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास होता. शिक्षण घेत स्पर्धा परिक्षा देखील तो देत होता. दरम्यान शुक्रवारी (दि.२३) घरातील सर्व सदस्य हे शेगाव येथे गेल्यानंतर निलेशने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मृतक निलेशची प्रेयसी त्याला वारंवार पैशांची मागणी करत होती व मानसिक त्रास देत होती, निलेशला आत्महत्या करण्यास त्याच्या प्रेयसीने प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप निलेशच्या नातेवाईकांनी केला आहे.
शनिवारी निलेशच्या नातेवाईकांनी दर्यापूर पोलीस ठाण्यावर धडक देऊन प्रेयसीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दोन तास ठिय्या दिला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ठाणेदारांशी चर्चेनंतर प्रकरण निवळले. उपजिल्हा रुग्णालय दर्यापुर येथे नातेवाईकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.पुढील तपास दर्यापूर पोलिस करत आहेत.
शुक्रवारी (दि.२३) घरातील सर्व सदस्य शेगावला दर्शनासाठी गेल्यानंतर निलेशने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करुन संवाद साधला. दोघांमधील संभाषणानंतर निलेश ने गळफास घेतला. निलेश आणि त्याच्या प्रेयसीमध्ये यावेळी नेमकं काय बोलणं झालं, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रेयसीसोबत संपर्क झाल्यानंतरच निलेशने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.