

अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात पुन्हा एकदा अंधश्रद्धेने कळस गाठल्याचा प्रकार मंगळवारी (दि.26) समोर आला आहे. हतरु आरोग्य केंद्राअंतर्गत ग्राम सिमोरी येथे 22 दिवसाच्या बाळाच्या पोटाला गरम सळीने तब्बल 65 चटके (डागण्या) देण्यात आल्या आहे. या अघोरी उपचारामूळे या बाळाची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्याला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सिमोरी येथील एका महिलेचे हे बाळ आहे. बाळाला कुठलातरी आजार झाल्याने अघोरी उपाय म्हणून या 22 दिवसाच्या बाळाला लोखंडी विळा गरम करुन तब्बल 65 वेळा चटके देण्यात आले. पोट जागोजागी जळाल्याने झालेल्या जखमांमध्ये इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे या बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. बाळाला आधी हतरु प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र बाळाची प्रकृती अत्याधिक खालावल्याने त्याला तेथील डॉक्टरांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले, तेथून त्याला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती (डफरीन) येथे दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकारामुळे मेळघाटातील अंधश्रद्धा पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे. शासन-प्रशासन जनजागृतीसाठी उपाययोजना करत असताना देखील येथील अंधश्रद्धा कमी होत नसल्याचे दिसून आले आहे.