अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जवाहरनगर येथील रेखा कॉलनीत भरदिवसा एका सराफ व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना बुधवारी (दि.4) उघडकिस आली. यानंतर चोरट्यांनी 25 किलो चांदीचे दागिने हिसकाऊन पळ काढला. या चोरट्यांनी झटापटी करताना सराफ व्यावसायिक वडील आणि मुलगा जखमी झाले आहे. यावेळी लुटमारीमध्ये अज्ञात लुटारू दोन दुचाकी आणि कारने आल्याची माहिती जखमी जावरे यांनी दिली. याबरोबरच आठ ते दहा जण होते असेही समजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षराज कॉलनीत अनेक वर्षांपासून सराफा व्यावसायिक असणारे अरविंद उत्तम जावरे यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. अरविंद जावरे हे त्यांचे ८० वर्षीय वडील उत्तमराव उखडराव जावरे यांना सोबत घेऊन बुधवारी दुचाकीने दुकानात जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्याजवळील एका बॅगेत चांदीचे तर दुसऱ्या बॅगेत सोन्याचे दागिने होते. ते घरापासून शंभरमीटर अंतरावरच असताना, अचानक दोन दुचाकीवर आलेल्या लुटारूंपैकी एकाने त्यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे अरविंद जावरे आणि त्यांचे वडील वाहनासह रस्त्यावर पडले. त्यावेळी एकाने लगेच त्यांच्या हातातील चांदीची बॅग हिसकावली आणि ती दुसऱ्या लुटारू जवळ फेकली. हा प्रकार पाहून अरविंद जावरे यांनी आपल्या जवळील सोन्याच्या दागिन्यांची एक बॅग त्याच परिसरातील ओळखीच्या व्यक्तीच्या अंगणात फेकून जोराने आरडा-ओरड केली आणि लुटारूचा विरोध सुरु केला. यानंतर घाबरुन चोरट्यांनी तेथून पळ काढला.
या घटनेनंतर अरविंद जावरे यांनी या घटनेची माहिती भाऊ सुनील जावरे यांना दिली. त्यानंतर या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलीसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी करून आरोपींची शोध मोहिम सुरु केली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची सात पथके तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणात अरविंद जावरे यांच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.