

अमरावती : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. ही घटना शनिवारी (दि.25) तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
अधिक माहितीनुसार, तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनल क्रमांक 131 वर पुण्याहून नागपूरकडे जाणारी एमएच 14/एलई 3307 या क्रमांकाची कार अचानक समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात कार चालक मंदार नातू (रा. पिंपरी चिचवड, पुणे), नीळकंठ चाबरेकर आणि सुनील धडस (केळगाव) हे जखमी झाले. गंभीर जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पुण्याहून नागपूरकडे जात असताना महामार्गावर किरजावाला जवळील 131 चॅनलवर ट्रक अचानक समोर आल्याने कार ट्रकवर आदळली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. जखमींना रुग्णवाहिकेतून अमरावती येथे हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. तळेगावचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. क्रेनच्या साहाय्याने वाहन हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान जखमींवर अमरावतीत रुग्णालयात उपचार सुरू आहे.