Samruddhi Express way Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

उभ्या कंटेनरला कारची धडक, चंदपूर शहरात शोककळा
Samruddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू,
Samruddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू,
Published on
Updated on

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आज २८ जून रोजी दुपारी पुन्हा एकदा येथे एका भीषण अपघाताने थरकाप उडवला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक १०५ जवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मृत चंद्रपूर येथील रहिवासी असून, एकाच कुटुंबातील तीन पिढ्या एका क्षणात संपल्याने संपूर्ण चंद्रपूर शहरावर शोककळा पसरली आहे.

आज २८ जून रोजी दुपारी चंद्रपूर येथील जीवने कुटुंब वॅगनआर कारने समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात होते. धामणगाव रेल्वे परिसरातील चॅनल क्रमांक १०५ जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागून अत्यंत जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी अपघातात जीवने कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आजोबा, आई-वडील आणि एका १२ वर्षीय चिमुरडीचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील ३ पिढ्या संपल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांमध्ये भास्कर महादेव जीवने (वय ४३), महादेव जिवाजी जीवने (वय ६५), लताबाई महादेव जीवने (वय ६०), आरती भास्कर जीवने (वय ४१) आणि जिज्ञा भास्कर जीवने (वय १२) यांचा समावेश आहे. मृत सर्वजण चंद्रपूर शहरातील शासकीय डी.एड. महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बहुपेठ परिसरातील रहिवासी होते. एकाच घरातील पाच जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी चंद्रपुरात पोहोचताच परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

दुपारी अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस आणि समृद्धी महामार्गाच्या आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारचा चेंदामेंदा झाल्याने मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाला मोठे कष्ट घ्यावे लागले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. प्राथमिक अंदाजानुसार, भरदुपारी चालकाला डुलकी आल्याने किंवा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, सर्व बाजूंचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news