

अमरावती : शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची शनिवारी (दि.१४) अचानक बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त राकेश ओला यांची अमरावती शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश ओला लवकरच अमरावतीत दाखल होऊन पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, अरविंद चावरिया यांची पुढील नियुक्ती नेमकी कुठे होणार, याबाबतचे अधिकृत आदेश अद्याप जाहीर झाले नाहीत.
२०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला हे कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून प्रभावी कार्यकाळ पार पाडला आहे. अलीकडेच ते मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. पोलीस सेवेत पदार्पणानंतर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पहिली नियुक्ती असताना त्यांनी कुख्यात इराणी टोळीचा पर्दाफाश करून विशेष लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर मे २०१६ मध्ये त्यांची सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालेगाव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. पुढे जून २०१७ मध्ये त्यांची नागपूर येथे पोलीस उपायुक्त (डीसीपी) झोन-१ म्हणून नियुक्ती झाली.
नागपूरमध्ये डीसीपी झोन-१ म्हणून कार्यरत असताना राकेश ओला यांनी अनेक आंतरराज्यीय चोरट्या टोळ्यांचा पर्दाफाश करत गंभीर गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या व्यापक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.