

अमरावती : मेळघाटात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. हरीसाल वन वर्तुळाअंतर्गत येणाऱ्या केसरपूर गावातील रहिवासी हरिराम धिकार हा रविवारी (दि.३) जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला होता. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने एकाएकी त्याच्यावर हल्ला केला. यात हरिराम जागीच मृत्युमुखी पडला.
त्याच्यासोबत चे इतर आदिवासी बांधव आपला जीव वाचवून कसेबसे तेथून पळाले. त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थ आणि वनविभागाला दिली. तत्काळ वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हरिराम धिकारचा मृतदेह शोधून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या घटनेनंतर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यासह सरपंच,उपसरपंच देखील घटनास्थळी पोहोचले. दरम्यान सध्या गावामध्ये भीतीचे वातावरण आहे.
मेळघाटात मानव व वन्य जीवांमध्ये संघर्ष होत असल्याचे गेल्या काही दिवसापासून दिसून आले आहे. यापूर्वी देखील चार जणांचा अशाच हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेनंतर आमदार रवी राणा, माजी आमदार केवलराम काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी देखील धारणी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हरिराम धिकार च्या मृतदेहाची पाहणी केली. कुटुंबीयांना सांत्वन पर भेट देऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.