

अमरावतीः अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही अपघाताची घटना बुधवार (दि.३० ऑक्टोबर) रोजी विचोरी ते अडगाव मार्गावर घडली. दिवाळीच्या पावन पर्वावर आई व मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील मुदसिर अहमद शेख गफूर (वय ३२) व तायराबानो शेख गफूर (वय ६५) हे दोघे हिरोहोंडा मोटरसायकल क्र.एम एच २७ सी एच १९४१ ने रिद्धपूर येथून काही कामानिमित्त नांदगाव पेठ येथे जात होते. दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणार्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर खाली कोसळले. यातच अधिक रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीवरील मुलासह आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना प्राप्त होताच ठाणेदार सचिन लुले यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नाकाबंदी करून चारचाकी वाहनाचा शोध घेतला. परंतु अज्ञात वाहन चालक तेथून फरार झाला होता. शिरखेड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे शवविच्छेदनाकरिता रवाना केले. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.