Amravati Crime : बिबट्याच्या कातडीसह तिघे जाळ्यात; वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाची धडक कारवाई

Amravati Crime
Published on
Updated on

अमरावती : मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभागाच्या पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. बिबट्याच्या कातडीचा तुकडा बेकायदेशीररीत्या बाळगणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने अटक केली असून, त्यांच्याकडून कातडी जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष, हरिसाल वनपरिक्षेत्र आणि वन्यजीव प्रेमी यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली.

अशी झाली कारवाई

वन विभागाला १२ जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिसरात सापळा रचण्यात आला होता. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे बिबट्याच्या कातडीचा तुकडा आढळून आला. वन अधिकाऱ्यांनी तत्काळ ही कातडी जप्त करून तिघांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

मध्य प्रदेशातील आरोपींना अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मांगीलाल किशोरी इवणे (वय ४५, रा. चिरा, जि. बैतुल, मध्यप्रदेश), दीपक बाबुलाल उईके (वय २५, रा. ढालगाव, जि. खंडवा, मध्यप्रदेश) आणि कमल रतन ठाकूर (वय ३१, रा. धामा गोलाई, जि. खंडवा, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.

मोठ्या रॅकेटचा शोध सुरू

जप्त करण्यात आलेल्या कातडीचा उगम कोठून झाला, ती कोणत्या बिबट्याची आहे आणि यामागे एखादे मोठे आंतरराज्य तस्करी रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध आता वन विभाग घेत आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून, वन्यजीवांच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीची साखळी मोडीत काढण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये हरिसाल वनपरिक्षेत्रातील कर्मचारी तसेच वन्यजीव प्रेमी चेतन भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news