

अमरावती : विदर्भात अकोला, यवतमाळ, अमरावती येथे मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र देण्यात आली. अकोला मध्ये 15000 प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे या तीनही जिल्ह्यांचे प्रमाणपत्रासंदर्भात फॉरेन्सिक ऑडिट करावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी गुरूवारी (दि.6) अमरावती येथे दिली.
भाजप नेते सोमय्या यांनी गुरूवारी अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशन येथे बांगलादेशी-रोहिंग्या बोगस प्रमाणपत्र प्रकरणी पुराव्यासह तक्रार दाखल केली. त्यांनतर ते बोलत होते.
संपूर्ण राज्यात बांगलादेशी-रोहिंग्याना बोगस प्रमाणपत्राचा नियोजित घोटाळा सुरू आहे. जन्म प्रमाणपत्रासाठी दोन लाख 23 हजार अर्ज आले. त्यापैकी 99 टक्के मुस्लिम समाजाचे आहेत. राज्यातील 54 शहरात 1 हजार ते 5 हजार अर्ज आले, त्यांना प्रमाणपत्र दिले गेले, असेही ते म्हणाले.
अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाने जन्म प्रमाणपत्रासाठी आलेल्या 1484 पैकी शून्य अर्ज फेटाळले. 585 ना सर्टिफिकेट दिले. आणि 900 जणांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या संदर्भात 100 पुरावे आज अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केले आहेत, तक्रार देखील दिली आहे. या संदर्भात लवकरच एफआयआर, गुन्हा दाखल होणार असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
येथील मुस्लिमांकडे जन्म प्रमाणपत्र आहे. सर्व कागदपत्रे आहेत. मात्र जे बाहेरून आले आहेत म्हणजेच जे बांगलादेशी आहेत त्यांच्याकडे कागदपत्रेच नाहीत. केवळ आधार कार्डच्या आधारावर बोगस सर्टिफिकेट टीसी तयार करण्यात आल्या. जन्म प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामुळे मी जे 100 पुरावे दिले त्याच्याशी संबंधित लोकांवर ताबडतोब एफआयआर दाखल करावी. या संपूर्ण प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयातील काही लोक सहभागी असून त्यामध्ये काही एजंट आणि वकिलांचा देखील सहभाग आहे. त्यामुळे आपण दिलेल्या शंभर पुराव्याच्या आधारावरच संपूर्ण 1484 अर्ज तपासावे, अशी मागणी ही किरीट सोमय्या यांनी केली.
जिल्हाधिकारी यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्याची मागणी करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. तहसीलदारांना जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांना देखील याचा जाब द्यावा लागेल. स्थानिक चौकशी समितीने अद्याप काहीही केलेले नाही,असा आरोपही सोमय्या यांनी केला.
गेल्या महिन्याभरापूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथील तहसिलदारांनी बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म नोंदीचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली होती. मात्र, गुरूवारी (ता.6) किरीट सोमय्या यांनी अंजनगावात दाखल होऊन पोलिसात तक्रार दाखल केली असल्याने येथील अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे बोलले जात आहे.