

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलगी जर दिसायला चांगली असेल तर ती तुमच्या, माझ्यासारख्याला भेटत नाही तर ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी पान टपरीवाल्याला अथवा किराणा दुकानदाराला भेटते. तीन नंबरची पोरगी शेतकऱ्याच्या पोराला (मुलाला) भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचे काही खरे राहिलेले नाही, असे महिलांचे वर्गीकरण करणारे वादग्रस्त वक्तव्य मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे.
भुयार यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. विशेष म्हणजे आमदार देवेंद्र भुयार हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक आहेत. अजित पवार गट महायुतीत सरकारमध्ये सहभागी असल्याने महायुती सरकारवरही टीका होते आहे. देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनीदेखील टीकास्त्र सोडले आहे.
ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होतो; त्याच ठिकाणचे आमदार इतक्या अपशब्दांमध्ये बोलतात. महिलांकडे बघण्याचा त्यांचा हा दृष्टिकोन आहे. महिला ही जननी आहे, त्यांना तुम्ही कॅटेगराइज करू शकत नाही. ती संसार चालवत असते. जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी असे आपण म्हणत असतो. महिलांच्या मतासाठी तुम्ही जीवाचे रान करत आहात आणि दुसरीकडे महिलांचे वर्गीकरण करून महिलांचा अपमान करत आहात. त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे? हे समजते, अशी टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी बुधवारी (दि.२) केली. अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावे. अशा प्रकारचे महिलांचे वर्गीकरण कोणीही खपवून घेणार नाही, अन्यथा समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांचे वर्गीकरण केले, ही अतिशय अपमानजनक गोष्ट आहे. पुढे नवरात्र आहे. महिलांना नवरात्रीत दुर्गेचे रूप मानले जाते. तुमचे सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना आणते आणि सरकारमधील तुमच्यासारखे सहकारी महिलांना अपशब्दांत बोलतात. यावरून तुमच्या सरकारचे आणि तुमचे डोके फिरलेले आहे, असे दिसत आहे. महिलांच्या मतदानासाठी काय करावे आणि काय बोलावे याचे सुद्धा भान यांना राहिले नाही. आगामी निवडणुकीत दुर्गेचे रूप असलेल्या महिला, लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमरावती महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र भुयार यांच्यावर टीका केला आहे. ''देवेंद्र भुयार यांचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषीक्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषीक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे, शेतकऱ्यांची टिंगल उडवणारे आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दुःखद आहे.'' असे अंधारे यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.