

अमरावती : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. दरम्यान अमरावतीत यास्मिननगर गल्ली क्रमांक - २ येथे सोमवारी (दि.२२ डिसेंबर) घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अवैध दारूविक्रीबाबत चौकशीसाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकासमोर संबंधित विक्रेत्याने स्वतःचा गळा कापून घेत गंभीर इजा केल्याची घटना घडली.
शेख अकिल शेख गफूर (वय ५५, रा. यास्मिननगर, गल्ली क्र. २) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी मंगेश लोखंडे व सतीश देशमुख सोमवारी (दि.२२) सकाळी सुमारे १०.३० वाजता संबंधिताच्या घरी धाड टाकण्यासाठी गेले होते. कारवाईदरम्यान शेख अकिल यांनी विरोध दर्शविला. पोलिसांकडून समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी धारदार शस्त्राने स्वतःचा गळा कापून अचानक गंभीर इजा केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले, नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच नागपूर गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत शेख अकिल यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल घेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, नागपूर गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. मात्र जखमी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांचा जबाब नोंदवता आला नाही.
दरम्यान, शेख अकिल यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला असून संबंधित कर्मचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी घरात प्रवेश करून मारहाण केल्यामुळेच शेख अकीलने आत्मघातकी कृत्य केल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. तसेच, शेख अकीलने मागील तीन महिन्यांपासून अवैध दारू व्यवसाय बंद केला असून तो सध्या ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिस सूत्रांनुसार, शेख अकीलवर यापूर्वीही अवैध दारू व्यवसायासह विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर गेट पोलीस ठाणे करीत आहे.