सरकारच्या फक्त घोषणा, अंमलबजावणी कधी? काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांचा सवाल

सरकारच्या फक्त घोषणा, अंमलबजावणी कधी? काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांचा सवाल

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकार केवळ घोषणा करते, मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार? असा सवाल काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती दौऱ्यावर आले असता त्यावरून आमदार वानखडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अमरावती दौऱ्यावर आले. शिवपुराण कथेच्या पार्श्वभूमीवरती ते अमरावती येथे आले. शिवपुराण कथेला आमचा विरोध नाही. मात्र, अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसानही त्यांनी पहावे अशी मागणी आ.बळवंत वानखडे यांनी केली. केवळ घोषणा करून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांच्या पदरी काही पडलं पाहिजे याचाही मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असेही ते म्हणाले.

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या वतीने अमरावतीच्या छत्री तलाव मार्गावर पंडीत प्रदिप मिश्रा यांचे शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली.

दरम्यान यावरून काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून आक्रमक होत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांवर त्यांनी सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही, अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे कुठलेच प्रश्न मार्गी लागले नाही. हे सरकार केवळ घोषणा करतं. त्याची अंमलबजावणी करत नाही, अशी टीका काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news