

अमरावती: स्वयंपाकासाठी पेटवलेल्या चुलीनेच एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. ओल्या लाकडांवर पेट घेण्यासाठी टाकलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने लागलेल्या आगीत एका ११ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला. मुस्कान परवीन शेख मोहसीबूर असे या मृत बालिकेचे नाव असून, ही हृदयद्रावक घटना शहरातील अलीमनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अलीम नगर येथील गल्ली क्रमांक २ मध्ये शेख मोहसीबूर यांचे कुटुंब राहते. रविवारी (दि.२७) सायंकाळी मुस्कानची आई स्वयंपाकासाठी चूल पेटवत होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने लाकडे ओली होती, त्यामुळे चूल पेटत नव्हती. वेळ वाचवण्यासाठी आणि चूल लवकर पेटावी म्हणून त्यांनी चुलीत थोडे पेट्रोल टाकले आणि काडी लावली. पेट्रोलमुळे आगीचा प्रचंड भडका उडाला. ही आग थेट घराच्या छताला लावलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीपर्यंत पोहोचली. क्षणातच ताडपत्रीने पेट घेतला आणि तिचा जळता भाग खाली खेळत असलेल्या ११ वर्षीय मुस्कानच्या अंगावर पडला. काही कळण्याच्या आतच मुस्कानच्या कपड्यांनीही पेट घेतला आणि ती गंभीररित्या भाजली गेली.
आगीत होरपळलेल्या मुस्कानला तिच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र तिची झुंज अपयशी ठरली. सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेने अलीमनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीमुळे एका निरागस मुलीचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. अशा घटना टाळण्यासाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर करताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.