शाळेत पहिला आल्याचा आनंद ठरला अखेरचा; मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाने हिरावले पोलीस उपनिरीक्षकाच्या लेकीचे प्राण

Amravati accident | या अपघातात राहुल वानखडे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत
Amravati accident
Amravati accident
Published on
Updated on

अमरावती: नियतीने कधी आणि कुठे घाला घालावा याचा नेम नाही, याचाच प्रत्यय अमरावती जिल्ह्यात आला आहे. शाळेत पहिला क्रमांक आल्याचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या एका पोलीस कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव चौफुलीवर बुधवारी एका भरधाव रुग्णवाहिकेने कारला दिलेल्या धडकेत तळेगाव दशासर येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे यांची ८ वर्षीय मुलगी त्रिशा हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकी घटना काय घडली ?

तळेगाव दशासरचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखडे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह खासगी कारने (MH 30 AZ 2910) प्रवास करत होते. देवगाव चौफुलीवर धामणगाव बाजूकडून यवतमाळकडे जाणारी रिकामी रुग्णवाहिका (MH 29 T 5857) अत्यंत वेगाने आली आणि तिने वानखडे यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

आनंदाचे रूपांतर शोकात

मृतक त्रिशा ही धामणगाव येथील 'एसओएस' शाळेत तिसऱ्या वर्गात शिकत होती. परीक्षेत तिचा प्रथम क्रमांक आला होता. आपल्या लाडक्या लेकीच्या या यशाचे पेढे वाटण्यासाठी वानखडे कुटुंब शाळेत गेले होते. तिथून परतताना पेट्रोल भरून घराकडे निघाल्यावर काही क्षणातच समोरून येणाऱ्या 'यमदूत' ठरलेल्या रुग्णवाहिकेने या कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावून नेला.

प्राथमिक माहितीनुसार, रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि गाडीमध्ये कोणताही रुग्ण नव्हता. हा सर्व थरारक अपघात चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात राहुल वानखडे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त रुग्णवाहिकेचा चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तळेगाव दशासर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news