

अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवार, दि. २२ ऑक्टोबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२१) जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांचा कामाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. तसेच सरमिसळ केल्यानंतर मतदानयंत्र संबंधित विधानसभा क्षेत्रात आजपासून पाठविण्यास सुरूवात करण्यात आली.त्याची देखील पाहणी करण्यात आली.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात दोन हजार ७०८ मतदान केंद्र राहणार आहे. यासाठी आवश्यक असणार्या मतदानयंत्राच्या २५ टक्के अधिक मतदान यंत्र उपलब्ध झाले आहे. मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी केली आहे. ही मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहे. सरमिसळनंतर या मतदानयंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप आजपासून लोकशाही भवनातून सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघाला २० टक्के अधिक मतदानयंत्र वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान आज जिल्हाधिकारी कटियार यांनी यांनी अमरावती आणि बडनेरा मतदारसंघाच्या नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येत असलेल्या कार्यालयाची पाहणी केली. अमरावती मतदारसंघासाठी तालुका प्रशासकीय भवनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची पाहणी केली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणार्यांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात. खर्च आणि परवानग्यांची योग्य माहिती देण्यात यावी. उमेदवारांना अर्ज, नमूने आणि आवश्यक त्या सूचना एकाचवेळी देण्यात याव्यात. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही कटियार यांनी दिले.