Devendra Fadnavis | डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रानिमिर्तीत योगदान देणारे ‘नेशन बिल्डर’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान
Devendra Fadnavis
मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Published on
Updated on

अमरावती : स्वातंत्र्यानंतर राष्ट्रानिमिर्तीत सातत्याने योगदान देणाऱ्यापैकी शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख हे एक ‘नेशन बिल्डर’ असून ‘फूड फॉर ऑल’ ची मुहूर्तमेढ भाऊसाहेबांनी रोवली आहे. त्यामुळे भाऊसाहेबांनी दाखविलेल्या शाश्वत मार्गाने चालण्याचाच आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी (दि.२७) केले.

अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य परिसरात आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पद्मभूषण डॉ.विजय भटकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.केंद्रीय आयुष मंत्री ना.प्रतापराव जाधव, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.अशोक उईके, शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.पंकज भोयर, राज्यसभा सदस्य खा.डॉ.अनिल बोंडे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आ.सुलभा खोडके, आ.परिणय फुके, आ.संजय कुटे, आ.राजेश वानखडे, आ.प्रवीण तायडे, आ.उमेश यावलकर, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, आ.प्रताप अडसड यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ ना.देवेंद्र फडणवीस यांना पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांच्या हस्ते देण्यात आला.आजपर्यंत मिळालेल्या देशविदेशातील पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार अधिक महत्त्वाचा असल्याचे फडणवीस पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले.आपल्या भाषणातून भाऊसाहेबांच्या कार्याचा समग्र आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मानवतेला नाकारणाऱ्या लोकांना नाकारण्याचे काम डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केले आणि आपल्या कृतीतून व व्यक्तिगत जीवनात त्या विरुद्ध बंड पुकारले.

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून बाहेर काढण्याचे काम सर्वप्रथम भाऊसाहेबांनी केले. पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून देशविदेशातील तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करून दिली. ते कृषी क्षेत्रातील सुधारणेचे जनक आहेत.भाऊसाहेबांच्या नावाने असलेल्या पुरस्कारातून मला स्फूर्ती मिळेल म्हणून आपण हा पुरस्कार स्वीकारला असून नवीन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमाने शेतीला कोरडवाहू पासून बागायतीपर्यंत आणण्याचा आपला प्रयत्न आहे व त्यासाठी विविध योजनांवर काम सुरु आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील शेलू येथील सुवर्णा अरविंद गावंडे यांना शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्काराने, अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील गोपाल किसनराव येऊल यांना शेतकरी नेते शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्काराने, वाशिम जिल्ह्यातील खरोळा येथील दीपक सुभाष वारकड यांना डॉ.पंजाबराव देशमुख शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगे यांनी दिलेल्या दाननिधीतून कस्तुरबा शाळेतील भक्ती गजानन चौधरी हिला ‘डॉ.पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विविध पुरस्कार प्रदान:या कार्यक्रमात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.पाच लक्ष रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुख्यमंत्र्यांनी या पुरस्काराची रक्कम संस्थेला भेट दिली. मानपत्राचे वाचन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य, आजी माजी प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी व विदर्भातून आलेले विविध जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news