

अमरावती : अनंत चतुर्दशीच्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरामध्ये गणेश विसर्जनात दुर्दैवी घटना घडली. विसर्जनासाठी गेलेली तरुणी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडली.
मुक्ता साहेबराव श्रीनाथ (वय 32, रा. दर्यापूर) असे मृत तरुणीचे नाव असून ती चंद्रभागा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेली होती. विसर्जनावेळी आरतीचे ताट बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना ती अचानक नदीच्या प्रवाहात वाहून गेली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वडील नसलेल्या मुक्ताच्या कुटुंबावर या घटनेने संकट कोसळले असून, प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. या घटनेमुळे दर्यापूर शहरात शोककळा पसरली आहे.