

Burning truck Nagpur Amravati highway
अमरावती : नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जाणार्या मालवाहू ट्रकचा रविवारी रात्री (दि.११) अचानक राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा येथे टायर फुटला. त्यानंतर क्षणातच त्या ट्रक ने पेट घेतला.अतिशय थरारक प्रसंगाने पाठीमागून येणारी वाहने मागेच थांबली होती.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने प्लॅस्टिक दाणे घेऊन मालवाहू ट्रक जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळ ट्रक येताच ट्रकचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्याचा मोठा आवाज झाला व ट्रकच्या टायरजवळ असलेले लायनर अचानक घासल्याने ट्रकने खालून पेट घेतला. पाहता-पाहता क्षणातच प्लास्टिक दाण्याने भरलेला ट्रक जळून कोळसा झाला. ट्रकने पेट घेतल्याची माहिती तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
अचानक राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पेटल्याने पाठीमागून येणारी वाहने दूरवरच थांबली होती. ट्रकमधून धूर निघत होता व आगीचे उंचच उंच लोट उडत होते. आगीचे हे दृश्य पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिवसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली.