

अमरावती, पुढारी वृत्तसेवा:
पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना चार वर्षांपूर्वी १३ फेब्रुवारी रोजी २०२१ रोजी जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. याप्रकरणातील आरोपी रोशन नागोराव मारोटकर (रा. चांदुररेल्वे तालुका) याला न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. १ मार्च रोजी मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
विधी सुत्रानुसार, १३ फेब्रूवारी २०२१ रोजी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी ५ वर्षींय मुलगी घराबाहेर तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. त्यावेळी आरोपी रोशनने पिडित मुलीसह तिच्या मैत्रिणीला हरबरा देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावले. यानंतर, त्याने पीडितेच्या मैत्रिणीला घरी पाठविले आणि त्यानंतर पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पिडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६ (एबी), सहकलम ३, ४, ५ (एम), ६ पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणात चांदुररेल्वे पोलिसांनी तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आरोपीचा दोष सिध्द झाला. त्यानुसार मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. यार्लागड्डा यांच्या न्यायालयाने आरोपी रोशन मारोटकर याला २० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावली. यासोबतच दंडाची रक्कम पीडितेच्या आईला देण्याचे आदेशित केले. याप्रकरणात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. शशीकिरण भगवतीप्रसाद पलोड यांनी प्रभावी युक्तीवाद केला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता तागडे, पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जाधव यांनी तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून एएसआय प्रवीण म्हाला, विजय वाट, मनोज देशमुख, अरुण हटवार यांनी सहकार्य केले.