

अमरावती: भारतीय जनता पार्टीचे सदस्य असताना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उघडपणे बंडखोरी केल्याप्रकरणी पक्षातील १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पक्षाच्या निर्णयांना आव्हान देणे तसेच पक्षाच्या हिताच्या विरुद्ध कारवाया करणे, ही कृत्य भारतीय जनता पार्टीच्या संविधानातील पक्षशिस्त निष्ठा व संघटनात्मक मूल्यांचा अपमान करणारी आहे. अशा पक्षविरोधी वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. यामुळे संघटनात्मक शिस्त धोक्यात आली असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे अमरावती भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी सांगितले.
निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये विवेक चुटके, ज्योती वैद्य, गौरी मेघवानी, किशोर जाधव, अनिषा मनीष चौबे, सचिन पाटील, संजय वानरे, सतीश करेसिया, शिल्पा पाचघरे, दीपक गिरोळकर, योगेश वानखडे, मेघा हिंगासपुरे, संजय कटारिया, रश्मी नावंदर, धनराज चक्रे यांचा समावेश आहे. यांना पक्षाच्या अधिकृत अधिकारांतर्गत व वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वसह सर्व पदांवरून तात्काळ शहर डॉ.अध्यक्ष नितीन धांडे यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपकडून ही कारवाई करण्यात आली.