अमरावती, पुढारी वृत्तसेवा: ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रवेशासाठी महाविकास आघाडीत रांगा लागतील, असे वक्तव्य केले होते, या संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अमरावतीत सोमवारी (दि.७) भाष्य केले आहे.
राजकारणातच नाही तर जिवंत माणसाच्या जगातही कालचक्र हे नेहमी फिरत असते. 2019 मध्ये हीच स्थिती आमची होती. हा आला तो आला अशी स्थिती होती, पुष्कळ रांग लागली होती. पण विश्वासघाताने नंतर आमचे सरकार गेले. जर सरकार गेले नसते, तर औषध द्यायलाही काँग्रेस राष्ट्रवादीकडे कोणी शिल्लक राहिले नसते. सगळी काँग्रेस-राष्ट्रवादी झाडून आमच्याकडे आली असती. कालचक्र मात्र बदलते. त्यामुळे खरी मजा आहे. त्यामुळे आता कालचक्र बदलल्याने त्यांच्याकडे रांग लागली. दोन-चार दिवसांनी एखादी घटना घडली, तर इकडे देखील रांग लागेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. कालचक्र सध्या देखील महायुतीच्या बाजूने आहे, असा दावाही त्यांनी (Chandrakant Patil) केला.
हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, साधारणता राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांवर आणि तत्वांवर जाते. आम्हाला मात्र तो अनुभव नाही कारण जिना यहा मरणा यहा, कुछ मिला तो भी, कुछ नही मिला तो भी हम नही छोडेंगे. पण ज्याचा संस्थांचा फार मोठा व्याप असतो. त्यांना आमदारकी, खासदारकी शिवाय जगणं अशक्य असते. संस्था जगवणे अशक्य असते. हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत राग नाही, त्यांना पक्षाने खूप काही दिले आहे.
मात्र, एखाद्या वेळेस आमदारकी नाही मिळाली. तर दर वेळेस मी लोकांना विचारून निर्णय घेतला, असे म्हणणे बरोबर नाही. शेवटी निर्णय आपण आपला करत असतो. आणि लोकांना समजावून सांगत असतो. नेत्याची व्याख्या तीच आहे जो नेतो. लीडर ची व्याख्या देखील तीच आहे जो लीड करतो. त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात की लोक तुमच्याबरोबर येणार आहेत? हा खरा प्रश्न आहे. पण आमच्या मनात कोणतीही कटूता नाही, असेही पाटील म्हणाले.