

अमरावती : बिटकॉइनमध्ये भरीव नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल २३.२५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडली असून, पीडित योगेश श्रीराम जाखोटिया (रा. ड्रीम्स पार्क रोड, अमरावती) यांनी ३ नोव्हेंबर रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी योगेश यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने “बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवा” असे सांगत त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. त्या ग्रुपमधील व्यक्तींनी क्रिप्टोकरन्सी आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणुकीचे सल्ले देत विश्वास संपादन केला. सुरुवातीला योगेश यांनी ५ हजार आणि १० हजार रुपयांची लहान रक्कम गुंतवली, ज्यावर थोडा नफा दाखवण्यात आला. त्यानंतर अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी मोठ्या रकमांची ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले.
योगेश यांनी बँक ऑफ बडोदा खात्यातून विविध खात्यांमध्ये एकूण २३.२५ लाख रुपये पाठवले. पैसे परत मागितल्यावर आरोपींनी बनावट स्लिप्स पाठवल्या आणि त्यानंतर संपर्क तोडला. फसवणुकीची जाणीव झाल्यावर योगेश यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.