

अमरावती: पुढारी वृत्तसेवा : सहकार विभागाच्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक न्यायालयाने बच्चू कडूंना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात अमरावती जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून अपात्र का करण्यात येऊ नये? , अशी नोटीस बच्चू कडूंना बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कडू यांना २४ फेब्रुवारीची मुदत होती. ती मुदत आता दोन आठवड्यांनी वाढविण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावली होती. जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे कडू यांच्यासंदर्भात तक्रार केली होती. बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल. तर त्याला पदावर राहता येत नाही, अशी तरतूद जिल्हा बँकेच्या उपविधीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील परभवानंतर बच्चू कडू यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर आता बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडू यांनी बबलू देशमुख गटातील तीन संचालकांना फोडून 11 संचालकांच्या मदतीने काँग्रेसच्या बबलू देशमुख यांना जिल्हा बँकेतील सत्तेपासून रोखले होते. त्यानंतर अमरावती जिल्हा बँकेतील सत्ताधारी आणि विरोधक असा तीव्र संघर्ष झाला होता. आता विधानसभेतील परावभवानंरत बबलु देशमुख यांच्यासह भाजप देखील बच्चु कडू यांना जिल्हा बँकेतील अध्यपदावरून दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
दरम्यान अशात आता अमरावती येथील विभागीय निबंधक सहकारी संस्था यांनी विरोधकांच्या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना चांगलं खडसावले होते. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह १२ संचालकांनी सहकार विभागाकडे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागीय निबंधकांनी बच्चू कडूंना नोटीस पाठवली आहे. यात थेट बच्चू कडू संचालक पदासाठी अपात्र ठरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तुम्हाला संचालक पदावरून निलंबित का करण्यात येऊ नये?, असा सवालही उपस्थित केला आहे.
बच्चू कडू यांच्यावर २०१७ मध्ये नाशिकमधील सुकरवाडा पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणि मारहाण करण्यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी नाशिकच्या विशेष न्यायालयाने २०२१ मध्ये त्यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील बारा संचालकांनी बच्चू कडूंना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमाप्रमाणे संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंत शिक्षा सुनावल्यास अशा संचालकांना बँकेच्या पदावर राहता येत नाही.
या नियमानुसार बच्चू कडू यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद अपात्र ठरत आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे. याबद्दल बच्चू कडू यांना पंधरा दिवसांत आपली बाजु विभागीय सहनिबंधकांकडे मांडावी, असे सांगण्यात आले होते. ती मुदत २४ फेब्रुवारीपर्यंत होती. आता त्याला दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.