

अमरावती: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि 'डेंजर' तडीपार लोकांनी श्रीमंतांच्या पैशातून मायक्रो फायनान्स कंपन्या सुरू केल्या असून, ४० टक्क्यांपर्यंत व्याज आकारून त्यांनी झिजीया करालाही मागे टाकले आहे. या कंपन्यांच्या जाचामुळेच ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. केरळ आणि तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अवैध सावकारी व मायक्रो फायनान्सविरोधात कडक कायदा करावा व या कंपन्यांचे ऑडिट करावे; अन्यथा फायनान्सच्या नावावर रंगबाजी करणाऱ्यांना तोडून काढू, असा थेट इशारा त्यांनी दिला.
रविवारी (दि. २९) अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना कडू म्हणाले की, सावकारी प्रकरणांच्या सुनावणीत निर्णय लांबवण्यासाठी सावकार थेट डीडीआर (DDR) कार्यालयापर्यंत पैसे पोहोचवतात. फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट आणि न्यायालयाच्या आदेशाने थेट घरे सील करण्याची प्रक्रिया अत्यंत अमानवीय आहे.
नागपूर अधिवेशनावर 'त्रिशूल' सायकल मार्च
मायक्रो फायनान्सविरोधात कडक कायदा करावा, विदर्भातील तरुणांना स्थानिक उद्योगांमध्ये रोजगार मिळावा आणि कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतमजूर, दिव्यांग व एकल महिलांना आर्थिक मदत मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार आणि शिवसेना यांच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 'त्रिशूल आंदोलना'च्या माध्यमातून सायकल मार्च काढण्यात येणार आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कुरळपूर्णा येथून निघालेली ही सायकल यात्रा मोझरी, तळेगाव, गोंडखैरी मार्गे ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे पोहोचेल व विधान भवनासमोर त्रिशूल रोवून सरकारला जाब विचारला जाईल, असे कडू यांनी सांगितले.
यवतमाळ-वणी पट्ट्यातील डब्ल्यूसीएल (WCL) कंपनीमार्फत एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असताना विदर्भातील एक हजार तरुणही रोजंदारीवर नाहीत. स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार मिळावा, यासाठी आगामी काळात शिवसेनेतर्फे बजाव पुंगी, हटाव लुंगी आंदोलन हे आंदोलन छेडले जाणार आहे.
अदानी प्रकल्पाला इशारा
मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाबाबत अधिकृत माहिती घेतल्यानंतरच भूमिका जाहीर करू. मात्र, या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार न मिळता केवळ अदानी समूहाचाच फायदा होणार असेल, तर त्यांना मेळघाटात पायही ठेवू देणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
डिलिमिटेशन बिलामुळे अमरावतीचे दोन खासदार होणार असतील तर ते चांगलेच आहे. तसेच, आगामी जानेवारी महिन्यात शरद पवार गट सत्तेत सहभागी होईल, असे सध्याचे चित्र असल्याचे सूचक विधानही बच्चू कडू यांनी केले.