Amravati Video Case : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीसह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ, २७ एप्रिलपर्यंत चौकशी सुरू राहणार

Amravati Video Case : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीसह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ, २७ एप्रिलपर्यंत चौकशी सुरू राहणार
Published on
Updated on

अमरावती : अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदसह चार आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढ केली आहे. परतवाडा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता असून तपासाची व्याप्ती वाढली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात आज, मंगळवारी (दि. २१) सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने युक्तिवाद केला की, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील डेटा त्यांच्या समक्ष तपासायचा आहे. तसेच आरोपींच्या बँक खात्यांची माहिती आणि त्यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करणे तपासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयाने पोलिसांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद, सहआरोपी उजैर खान इकबाल खान, मोहम्मद साद मोहम्मद साबिर आणि तबरेज खान तसलीम खान यांना वाढीव पोलीस कोठडी सुनावली.

तपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये ८ पीडित मुलींच्या १८ चित्रफिती (व्हिडिओ) आणि ३९ छायाचित्रे आढळून आली आहेत. जप्त केलेले एकूण ११ मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि हार्ड डिस्क विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात एका १५ वर्षीय मुलीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

परतवाडा परिसरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून सामाजिक संघटनांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील इतर पीडित मुलींना भीती न बाळगता तक्रार दाखल करण्यासाठी समोर येण्याचे आवाहन केले असून, त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, आरोपींना अचलपूर न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास विशेष तपास पथकामार्फत (SIT) वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news