

अमरावती : भरधाव चार चाकी वाहनाचा टायर फुटून ते वाहन थेट झाडावर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका २२ वर्षिय युवकाचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.११) धामणगाव - यवतमाळ मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ घडली. गणेश गजानन शेळके (वय २२, रा.जळगांव आर्वी ता.धामणगांव रेल्वे )असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रात्री उशिरा मृतक गणेश शेळके व त्यांचे तीन मित्र, कुश मेश्राम ( वय २१ धामणगाव रेल्वे) ,अक्षय राजू टोक ( वय १९ ) व यश डोळे (वय २०, धामणगाव रेल्वे) हे चारचाकी वाहन क्रमांक एम एच ०२/ सी बी ७९०७ मध्ये बसून धामणगाव वरुन भरधाव वेगाने यवतमाळच्या दिशेने जात होते. त्यावेळी दत्तापूरच्या समोर एका पेट्रोल पंपा जवळ त्यांच्या वाहनाचा टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनथेट एका निंबाच्या झाडाला जाऊन धडकले.
धडक इतकी जबर होती की , त्यामध्ये चारचाकी वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात गणेश गजानन शेळके याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तर कुश मेश्राम, अक्षय टोक व यश डोळे हे देखील जखमी झाले. काही नागरिकांच्या मदतीने त्या सर्वांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणले होते. येथे तपासणीनंतर डॉक्टरांनी गणेश शेळके याला मृत घोषित केले. जखमी कुश, यश व अक्षय या तिघांवर सध्या उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन घटनेचा पुढील तपास ठाणेदार गिरीश ताथेड यांच्या मार्गदर्शनात दत्तापूर पोलीस करीत आहे.