

VBA Candidate Nomination Rejected
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यांच्या शपथपत्रातील प्रत्येक पानावर स्वाक्षरी नसणे आणि उच्च शैक्षणिक अर्हतेची माहिती अपूर्ण असणे, या तांत्रिक त्रुटींमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहेरोश यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे, छाननी प्रक्रियेदरम्यान महायुती आणि इतर उमेदवारांवर घेतलेले विविध आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यावर शिंदे गटाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे आणि अनिल काळे यांनी शासकीय निवासाचे प्रमाणपत्र आणि पोलीस तक्रारीबाबत हरकती घेतल्या होत्या, मात्र त्या अमान्य करण्यात आल्या. तसेच काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांच्या अर्जांवरील आक्षेपही फेटाळण्यात आले. त्यामुळे या प्रमुख उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे.
छाननीअंती सध्या ३० उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होते आहे. बंडखोर आणि अपक्ष उमेदवार काय भूमिका घेतात, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी अनेक पक्षांतील अंतर्गत बंडखोरीमुळे या निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांमध्ये किरण सरनाईक (शिवसेना-महायुती), आदिती पोहरे (काँग्रेस-मविआ), संगीता शिंदे (भाजप बंडखोर), प्रा. श्रीकांत देशपांडे (अपक्ष -शिंदे गट बंडखोर) आणि दत्तात्रय लहाने (शिवसेना उबाठा ) तसेच शेखर भोयर (अपक्ष भाजप बंडखोर) यांचा समावेश आहे.