Amravati Teacher Constituency Election : महायुतीत बंडखोरी, मविआत फूट; २६ उमेदवारांमुळे चुरशीची लढत

Amravati Teacher Constituency Election : महायुतीत बंडखोरी, मविआत फूट; २६ उमेदवारांमुळे चुरशीची लढत
Pudhari
Published on: 
Updated on: 

राजरत्न मोटघरे

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची आणि रंजक बनली आहे. शैक्षणिक संघटनांचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात राजकीय पक्षांची थेट एन्ट्री झाल्यामुळे समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यातच महायुतीमधील बंडखोरी आणि महाविकास आघाडीतील (मविआ) फूट यामुळे निवडणुकीची लढत बहुरंगी आणि अनिश्चिततेकडे झुकताना दिसत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा शिवसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यासाठी यंदाची वाट अत्यंत काटेरी ठरत आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून तिकीट न मिळाल्यामुळे गत निवडणुकीचे प्रतिस्पर्धी तथा शिक्षक आघाडीचे माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असताना हा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्यात आला. त्यामुळे भाजपच्या संगीता शिंदे, शेखर भोयर आणि डॉ. सुमित पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परिणामी, महायुतीची मते विभागली जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीत फूट

समन्वयाच्या अभावाचा फटका महाविकास आघाडीलाही बसला असून, येथेही मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) कडून दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसने प्रा. आदिती पोहरे (माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या) यांना मैदानात उतरवले आहे. प्रा. आदिती पोहरे यांच्या पाठीशी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा प्रभाव आणि एकगठ्ठा मतदार असल्याचे सांगितले जात असले, तरी मविआतील अंतर्गत फुटीमुळे सत्ताविरोधी मते एकत्र येण्याऐवजी विभागली जाण्याची दाट शक्यता आहे.

बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीच्या हालचाली

बंडखोरी रोखण्यासाठी आता महायुतीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अमरावती येथील एका बैठकीत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक रणनीती जाहीर केली. महायुतीच्या मतांची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष बैठकीमध्ये बंडखोरांची समजूत काढण्याबाबत आणि सर्व घटकांमध्ये समन्वय साधण्याबाबत अंतिम चर्चा होणार आहे.

पाच जिल्ह्यांत ३५,८१० मतदार

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होत आहे. यासाठी पात्र मतदारांची संख्या एकूण ३५,८१० इतकी आहे. यामध्ये अमरावती जिल्हा - १०,०९७, बुलढाणा जिल्हा - ९,१३४, यवतमाळ जिल्हा - ६,९३२, अकोला जिल्हा - ५,९४२ आणि वाशिम जिल्हा - ३,७१५ असे जिल्हानिहाय मतदार आहेत. यावेळी अमरावती विभागात एकूण ८१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यांची जिल्हानिहाय संख्या अमरावती - २५, बुलढाणा - १८, यवतमाळ - १८, अकोला - १३ आणि वाशिम - ७ अशी आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत पात्र ३५,६२२ शिक्षक मतदारांपैकी ३०,९१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता; मात्र मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार मतदान करताना झालेल्या चुकांमुळे १,०८९ मते बाद ठरून २९,८२९ मते वैध ठरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news