

अमरावती :पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत अमरावती महानगरपालिकेने शहराचा अधिकृत शहर पक्षी (सिटी बर्ड) म्हणून तांबट (Coppersmith Barbet) जाहीर केला आहे. हा उपक्रम माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत राबविण्यात आला. याची घोषणा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते हॅपी स्ट्रीट कार्यक्रम येथे करण्यात आली.
असा उपक्रम राबविणारे अमरावती शहर महाराष्ट्रातील पहिलेच ठरले आहे.शहरपक्षी निवडीसाठी अमरावती महानगरपालिका आणि वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्था, अमरावती (WECS) यांच्यात एमओयू करण्यात आला होता. नागरिकांच्या सहभागातून प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले. निवड प्रक्रिया १८ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान खुली ठेवण्यात आली होती. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
उपक्रमाचे उद्दिष्ट:जैवविविधतेचे संरक्षण व वाढ,पक्षी व पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे,अमरावतीला एक अनोखी, पर्यावरणपूरक ओळख देणे आदी उद्दिष्ट ठेवण्यात आले. या घोषणेसोबतच, शहरातील पर्यावरणीय अभिमानाचे प्रतीक म्हणून तांबट पक्ष्याची एक भव्य मूर्ती लवकरच उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे या उपक्रमाची कायमस्वरूपी आठवण शहरात जपली जाईल. हा उपक्रम राबवून अमरावती हे महाराष्ट्रातील पहिले महापालिका शहर ठरले आहे, ज्याने अधिकृत शहर पक्षी जाहीर करून पर्यावरण संरक्षणात अग्रणी भूमिका बजावली आहे. अमरावती महानगरपालिका व WECS यांचे हे संयुक्त पाऊल शहराच्या हरित भविष्यासाठी दिशादर्शक ठरत आहे.