

Amravati Shivar Student Death
अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शिवर येथील वर्ग बारावी विज्ञान शाखेत शिकणार्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना सोमवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
सोनल विनोद इंगळे (वय १६) रा.शिवर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. घरातील सदस्य झोपले असता रात्रीच्या सुमारास छताच्या लोखंडी कडीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत नोंद केली.
उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार पार पडले. सदर घटनेचा तपास दर्यापूरचे ठाणेदार सुनिल वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनिष दुबे करीत आहेत. सोनलचे आई-वडील शेतीमजुरी करतात. तिच्या मागे आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे.