

अमरावती : गाडगे नगर पोलीस ठाणे हद्दीत येणार्या महेंद्र कॉलनी अमर नगर येथील एका नामांकित शाळेमध्ये शिकणार्या तेरा वर्षीय विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये पिस्तुल आढळल्याची घटना मंगळवारी समोर येताच एकच खळबळ उडाली.
या संदर्भात वर्ग शिक्षिकेने गाडगे नगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि पिस्तूल ताब्यात घेतली. मुलाचे वडिल मुजीब अली खान अझर अली खान (वय ४०,पॅराडाईज कॉलनी ) यांच्याविरुद्ध कलम ६/ २८ आर्म अॅक्ट सहकलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार अमर नगर येथील एका नामांकित शाळेत शिकणार्या वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा सोमवारी शेवटचा पेपर होता. पेपर देण्यासाठी तो शाळेमध्ये गेला होता. यावेळी वर्गशिक्षकीने जेव्हा त्याची बॅग तपासली तेव्हा त्यामध्ये काळ्या रंगाची एअरगन त्यांना दिसली. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती गाडगे नगर पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीस शाळेमध्ये पोहोचले. त्यांनी एअरगन जप्त केली. या संदर्भात विद्यार्थ्याला विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितले की ही पिस्तुल त्याच्या वडिलांची आहे. आपल्या मित्रांना पेपर झाल्यावर पिस्तुल दाखवण्यासाठी तो घरून घेऊन आला होता. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याचे वडील मुजीब अली खान यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. या घटनेमुळे शाळा आणि पॅराडाईज कॉलनी परिसरात खळबळ उडाली होती.