

Amravati Accident News
अमरावती - परतवाडा बस स्थानकातून प्रवाशांना घेऊन निघालेल्या धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची घटना बुधवारी २१ मे रोजी आष्टी ते वलगांव दरम्यान घडली. सुदैवाने बसमध्ये बसलेले ७० प्रवासी थोडक्यात बचावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. माहितीनुसार, परतवाडा डेपोमधून बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६२७६ प्रवाशांना घेऊन अमरावतीसाठी निघाली होती. धावत्या बसचे चाक अचानक आष्टी ते वलगाव दरम्यान टाकरखेडा पूर्णाजवळ निखळले. चालकाने समय सूचकता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील ७० प्रवासी सुखरूप आहेत.
यावेळी बसमध्ये चालक समीर सौदागर आणि वाहक म्हणून एस. एल थोरात कार्यरत होते. त्यांनी सतर्कता दाखवली. यामुळे सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. तत्काळ प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले. घटनेची माहिती अमरावती विभागीय वाहतूक नियंत्रक व एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. यापूर्वीही पुणे आणि अमरावती ते आसेगाव मार्गे जाणाऱ्या बसचे चाक निघाल्याची घटना घडली आहे. महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.