

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावतीवरून यवतमाळकडे जाणा-या शिवशाही बस ने अचानक पेट घेतला. पाहत पाहता ही बस आगीत जळून खाक झाली. ही धक्कादायक घटना शनिवारी २२ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर गावाजवळ घडली. या आगीमुळे बसमधील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. सुदैवाने चालक-वाहक व प्रवाशी बस खाली उतरले, त्यामुळे जीवीतहानी टळली.
शनिवारी (दि.२२) दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान अमरावती आगाराची शिवशाही बस ( क्रमांक एम एच ०६ बि डब्यु ०२९४ ) यवतमाळकडे भरधाव जात होती. दरम्यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चोर माहुली गावाजवळ बस असताना, दुपारी ४ वाजताच्या सुमारास बसच्या बोनेटमधून धुर निघत असल्याचे चालक व्ही.पी.ढोलवाडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ बस रस्त्याचे कडेला उभी केली. त्यानंतर चालक, महिला वाहक यांनी बसमधील तीन प्रवाशांना खाली उतरवले. दरम्यान शिवशाही बसच्या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे या घटनेची माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांना देण्यात आली. त्यानंतर बडनेरा येथील अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत शिवशाही बस पूर्णतः जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत जीवित झाली नाही. बसमध्ये केवळ तिन प्रवासी होते. बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली.