

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या संताजी नगर परिसरात ४५ वर्षीय महिलेची घरातच गळा चिरून हत्या झाल्याची घटना रविवारी (दि.३०) रात्री उघडकीस आली. नीलिमा उर्फ पिंकी संजय खरबडे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अधिक माहितीनुसार, शनिवारी रात्री नियमितपणे साफसफाईसाठी येणारे अशोक खंडारे (वय ६०) यांनी महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ते परतले. रविवारी दुपारी पुन्हा त्यांनी दरवाजा ठोठावला, परंतु यावेळीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पिंकीच्या भावाला संपर्क साधला. भावाने घटनास्थळी येऊन दरवाजा उघडला तेव्हा पिंकी घरात रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. प्राथमिक तपासात हा खून शनिवारी रात्री झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावरील भिंतीवर रक्ताचे शिंतोडे आणि आक्षेपार्ह शब्द लिहिलेले आढळले. त्यामुळे या प्रकरणामागील कारण अस्पष्ट असून तपासात नव्या दिशांचा विचार केला जात आहे.
फॉरेन्सिक तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घरातील वस्तूंची मांडणी, रक्ताचे नमुने आणि आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. घरात जबरी चोरीचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी वैयक्तिक कारण, ओळखीतील व्यक्ती किंवा अन्य वाद या सर्व शक्य दिशांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहे.