

अमरावती : अमरावतीत रामपुरी कॅम्प परिसरातील सच्चूराम दरबार येथे बांधकामाधीन असलेल्या प्रवेशद्वाराचा (कमान) एक भाग मंगळवारी (दि.१०) सायंकाळी अचानक कोसळला. या अपघातात ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच अमरावतीच्या महापौरांच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ काम सुरू करण्यात आले. मंगळवारी प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच अचानक ही संपूर्ण कमान कोसळली, ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. अपघाताच्या वेळी घटनास्थळी ८ ते १० कामगार काम करत होते.
घटनेची माहिती मिळताच अमरावती महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, भूमिपूजनानंतर काहीच दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे कमानीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरक्षेच्या आणि गुणवत्तेच्या नियमांना बगल देऊन हे काम सुरू होते का? तसेच या बांधकामाच्या देखरेखीची जबाबदारी कोणावर होती? असे सवाल उपस्थित करत या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.