

Hindu Mahasabha state president death
अमरावती : राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजापेठ–बडनेरा मार्गावर झालेल्या कार अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. यामध्ये हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष नितीन नारायणराव व्यास (वय ५२) आणि हॉटेल व्यावसायिक रोशन वसंतराव गंणथडे (वय ३८) यांचा समावेश आहे. दोघेही अमरावतीमधील बुधवारा खोलपुरी गेट परिसरातील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ ते १.४५ वाजताच्या सुमारास अपघात झाला. नितीन व्यास आणि रोशन गंणथडे इकोस्पोर्ट (एमएच २७ एआर ८३३३) कारने बडनेर्याकडून अमरावतीकडे परतत होते. टाटा पेट्रोल पंपाजवळ कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट रस्त्यालगतच्या ‘युनिव्हर्सल गॅरेज’च्या भिंतीवर आदळली.
अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळाजवळील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र आवश्यक आयसीयू सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली.
रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले. याबाबत बडनेरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नितीन व्यास हे हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष, युवक आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष, भगवा सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष व ब्राह्मण महासंघाचे विदर्भ अध्यक्ष अशी विविध पदे भूषवत होते. रोशन गंणथडे हे हॉटेल व्यवसायात कार्यरत होते. बडनेरा पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.