

Amravati Ayan Ahmed Tanveer
अमरावती : परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदसह इतरांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. २७) संपली. अचलपूर न्यायालयाने यातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, एका आरोपीला दुसर्या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपी उजेर खान इकबाल खान याला न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी अयान अहमद, मो. साद मो. साबिर, तबरेज खान तसलीम खान व अहफाज खान मंसूर खान यांना एमसीआर अंतर्गत तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्यात आले.
या प्रकरणात सुरुवातीला कोणतीही पीडित पुढे आली नव्हती. मात्र पोलिसांच्या आवाहनानंतर आता तीन पीडिता पुढे आल्या आहेत. रविवारी तिसरी पीडित असलेल्या १६ वर्षीय तरुणीने आरोपी अयान अहमदने तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केल्याचा जबाब महिला एसआयटी अधिकार्यांकडे नोंदविला. त्यानंतर परतवाडा पोलिसांनी या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ७४ जोडले आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपी अयान अहमदसह एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली होती.
पोलीस कोठडी संपल्यानंतर अयान अहमद, उजैर खान, मो. साद, एहफाज खान आणि तरबेज खान यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्वांची रवानगी कारागृहात करण्याचे आदेश दिले. मात्र, आरोपी उजैर खान याच्यावर एका १६ वर्षीय मुलीचा छळ केल्याप्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात १९ एप्रिल रोजी स्वतंत्र गुन्हा दाखल झाला होता. या दुसर्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.
जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांमधील डेटाचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यावर तपास पथकाचा भर आहे. तपासाची व्याप्ती मोठी असल्याने, इतर पीडित मुलींनी कोणत्याही भीतीला किंवा दडपणाला बळी न पडता धैर्याने पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.