

अमरावती : शहरात गाजत असलेल्या कोट्यवधींच्या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी मोठी कारवाई करत फरार आरोपींना (दि.२५) अटक केली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या मुख्य आरोपीच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्यात आल्याने या रॅकेटची व्याप्ती अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपुरी गेट पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एनडीपीएस प्रकरणात आधीच अटकेत असलेला आरोपी साकिब जावेद मोहम्मद आसिफ कुरेशी (वय २५, रा. गवळीपुरा) याच्या राहत्या घराची झडती घेतली असता पोलिसांनी तब्बल ५३ ग्रॅम एमडी (अंदाजे किंमत ७ लाख ९५ हजार रुपये) जप्त केली. या कारवाईमुळे आरोपींच्या साठवण आणि वितरणाच्या साखळीबाबत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी अब्बास अहमद कुरेशी (वय २८, रा. चांदूर बाजार) आणि साकिब जावेद कुरेशी (वय २५, रा. गवळीपुरा) यांना गुन्हे शाखेने सुफियान नगर परिसरातून सापळा रचून अटक केली. यापूर्वी ८ मार्च रोजी पोलिसांनी अब्दुल फहीम उर्फ फहिम व शेख अयान यांच्याकडून तब्बल २ किलो ८० ग्रॅम एमडी (३ कोटी ११ लाखांहून अधिक किंमतीची) जप्त केली होती.
तपासादरम्यान हा अंमली पदार्थ मुंबईहून अमरावतीत आणून स्थानिक स्तरावर वितरित केला जात असल्याचे समोर आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही अंमली पदार्थाशी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर आतापर्यंत या प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने अटक आरोपींना २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ तसेच सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या देखरेखीखाली, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.