

अमरावती : शहर गुन्हे शाखा आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत अमरावती रेल्वे स्थानक परिसरातून सरकारने बंदी घातलेल्या एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणात एका संशयिताला रंगेहाथ अटक करण्यात आली असून मुख्य पुरवठादार सध्या फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे.
शुक्रवारी (दि.२४) गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, बंदी घातलेल्या व अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची पार्सल रेल्वेमार्गे अमरावतीत येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयाजवळ सापळा रचला. काही वेळाने एक संशयित व्यक्ती पोती घेऊन उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव चेतन सुखलाल ठाकरे (रा. मंगरूळ दस्तगीर) असे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडील पोत्यांची झडती घेतली असता बंदी घातलेल्या कापूस बियाण्यांची मोठी खेप आढळून आली. या कारवाईत एकूण ८०५ पाकिटे जप्त करण्यात आली. त्यांची अंदाजित किंमत ८ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चेतन ठाकरे याला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी विशाल प्रकाश भोईर (रा. नंदुरबार) हा फरार आहे. शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.बॉक्स:दरम्यान, एचटीबीटी कापूस बियाण्यांना केंद्र सरकारची मान्यता नसल्याने त्यांची विक्री व वापर बेकायदेशीर आहे. ही बियाणे पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात तसेच जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी अशा बियाण्यांचा अवैध व्यापार केला जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई अमरावती पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये एपीआय दशरथ अहे, महेश इंगोले, मनीष वाकोडे, गजानन सोनवणे, दीपकुमार सोनवणे, दीपेश सोनवणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कारवाई दरम्यान व्हाईट गोल्ड ५ एन कापूस बियाणे – ४७३ पाकिटे (किंमत ४,७३,००० रुपये), धूम-२ कापूस बियाणे – ३०६ पाकिटे (किंमत ३,६०,००० रुपये), संकरित बियाणे – २६ पाकिटे (किंमत २६,००० रुपये) अशी एकूण ८०५ पाकिटे (किंमत ८,६०,००० रुपये) जप्त करण्यात आली आहे.