

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एक ३२ वर्षीय तरुण काही काळ केनियात नोकरी करत होता. मायदेशी परतताना त्याचा युगांडा येथे प्रवासादरम्यान थांबा झाला होता. युगांडामध्ये इबोला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने त्याची वैद्यकीय तपासणी व निरीक्षण सुरू केले.
मायदेशी परतल्यानंतर या तरुणाला ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणे जाणवत असल्याने त्याने अंजनगाव सुर्जी येथील खासगी दवाखान्यात दोन दिवस उपचार घेतले. मात्र, त्याचा युगांडा येथे प्रवास झाल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कोणताही धोका न पत्करता त्याला पुढील तपासणीसाठी अमरावती येथून नागपूर येथे हलविले.
एम्स नागपूर येथे त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन इबोला संसर्गाच्या तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. या तपासणीचा अहवाल इबोला संसर्गासाठी निगेटिव्ह आला असून, त्यामुळे संबंधित तरुणाला इबोला झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे त्याच्या कुटुंबीयांसह अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. संबंधित तरुणाची इबोला चाचणी निगेटिव्ह आली आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती किंवा गैरसमज मनात बाळगू नये. आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर आवश्यक ते लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
- डॉ. शंतनू नागपूरकर, तालुका आरोग्य अधिकारी, अंजनगाव सुर्जी