Amravati News : शौचालयासाठी बांधलेल्या टाकीत पडून ८ वर्षीय बालकाचा मृत्यू, शिक्षक कॉलनीतील दुर्दैवी घटना

घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा
Amravati News : शौचालयासाठी बांधलेल्या टाकीत पडून ८ वर्षीय बालकाचा मृत्यू, शिक्षक कॉलनीतील दुर्दैवी घटना
Published on
Updated on

अमरावती : शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिक्षक कॉलनी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळताना शौचालयासाठी बांधण्यात आलेल्या उघड्या टाकीत पडून एका ८ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २७) उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत बालकाचे नाव कार्तिक अमोल ठाकरे (वय ८ वर्षे) असे असून, तो परिसरातील इतर मुलांसोबत खेळत होता. खेळाच्या नादात त्याला परिसरातील शौचालयासाठी बांधलेली उघडी टाकी दिसून आली नाही आणि तो थेट त्यात पडला. घटनेच्या वेळी सोबत असलेली इतर मुले घाबरून तेथून निघून गेल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

दरम्यान, बराच वेळ झाला तरी कार्तिक घरी परतला नाही, म्हणून त्याच्या पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असतानाच त्यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलगा टाकीत पडल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने कार्तिकचा मृतदेह टाकीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, खोलापुरी गेट पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news