

Arson Attack Amravati
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदीपुरा परिसरात महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांना घरात जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी पतीनेच घराला बाहेरून आग लावल्याचा आरोप असून, सुदैवाने वेळेत मदत मिळाल्याने महिला आणि तिच्या दोन्ही मुलांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, अमरावतीत टीनाली गोळे नामक महिला आपल्या ७ वर्षीय मुलगी आणि १४ वर्षीय मुलासोबत नंदीपुरा परिसरात भाड्याच्या घरात राहत होत्या. टीनाली गोळे आणि त्यांचे पती अमोल गोळे यांच्यात कौटुंबिक वाद असल्याचे सांगण्यात येत असून, दोघांमध्ये घटस्फोटाची केस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अमोल गोळे हा कथितरित्या घराजवळ आला,असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने खिडकीतून घरात पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ टाकला आणि घराचा दरवाजा बाहेरून बंद करून आग लावल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, ३० सप्टेंबरच्या रात्री १२:२० वाजता एक संशयित व्यक्ती घराजवळ येताना दिसत आहे.
घरात अचानक आग लागल्याने महिला आणि तिच्या दोन मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. आगीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोठी धडपड करावी लागली.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणातील संशयित अमोल गोळे हा घटनेनंतर फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.