

अमरावती: अमरावती महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत शुक्रवारी (दि.६) राजकीय भूकंप झाला असून चक्क ‘एमआयएम’ नगरसेविकेने भाजपला मतदान केले. पक्षाची तटस्थ राहण्याची भूमिका झुगारून भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार्या एमआयएमच्या नगरसेविकेला पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
या नाट्यमय घडामोडींमुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली असून एमआयएममधील अंतर्गत फूट चव्हाट्यावर आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत महापौरपदाची निवडणूक महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बडनेरा जुनी वस्ती प्रभागातील एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांच्या बाजूने हात उंचावून मतदान केले.
गटनेत्यांनी त्यांना चूक सुधारण्याची संधी दिली, मात्र कांबळे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. इतकेच नव्हे तर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांना पाठिंबा दिला. या प्रकारानंतर एमआयएमचे शहराध्यक्ष हाजी इरफान यांनी मीरा कांबळे यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याची घोषणा केली. 'पक्षाला गद्दारांची गरज नाही,' अशा कडक शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, 'मी माझ्या स्वतंत्र विचारांवर ठाम असून कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे,' असे प्रत्युत्तर मीरा कांबळे यांनी दिले आहे.
नगरसेवकपद धोक्यात येणार का?
या संपूर्ण प्रकरणात एक तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. एमआयएमने आपल्या सदस्यांसाठी अधिकृत 'व्हीप' (पक्षादेश) जारी केला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मीरा कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी झाली असली, तरी त्यांचे नगरसेवक पद कायद्याने रद्द होणार की कायम राहणार, याबाबत आता कायदेतज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
असे झाले मतदान-
महापौरपदासाठी भाजपचे श्रीचंद तेजवानी आणि काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते यांच्यात थेट लढत झाली. हात उंचावून झालेल्या मतदानात तेजवानी यांना तब्बल ५५ मते , तर शिरभाते यांना १६ मते मिळाली. उपमहापौरपदासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे विजयी ठरले.
दरम्यान, महापालिकेत भाजप-नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता स्थापन केली असून भाजप २५ , युवा स्वाभिमान पक्ष १५ , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ११ , शिवसेना शिंदे गट ३ सदस्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा बहुमताचा आकडा अधिक मजबूत झाला. महापालिकेत सत्ता स्थापनेत सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्मुला अमलात येणार आहे. त्यामुळे घटक पक्षांकडे पदांची अदलाबदल काही कालांतराने होईल.